BHIVANDI : अंजूरफाटा परिसरातील २५८ झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई; पुनर्वसनाच्या मागणीने नागरिक आक्रमक
भिवंडी शहरालगत दिवा-वसई रेल्वेमार्गावरील अंजूरफाटा परिसरातील लक्ष्मण नगर झोपडपट्टीवर मध्य रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील या परिसरातील तब्बल २५८ झोपड्या जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या.
मागील सुमारे ३० वर्षांपासून या ठिकाणी आदिवासी आणि भटक्या समाजातील कुटुंबे वास्तव्यास होती. स्थानिक ग्रामपंचायतीकडून या भागात वीज, पिण्याचे पाणी यांसारख्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच येथे अंगणवाडीही सुरू करण्यात आली होती.
मात्र, रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली. दरम्यान, संबंधित कुटुंबांचे पुनर्वसन होईपर्यंत कारवाई थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून माजी सरपंच राजेंद्र भोईर यांनी प्रशासनाकडे याबाबत कैफियत मांडली आहे.





