ULASNAGAR : उल्हासनगर दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोन आरोपी अटकेत; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलाश कॉलनी परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गोळीबार करून फरार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली खळबळ आणखी वाढली आहे.
उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलाश कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारात दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेत अनिल चव्हाण आणि अमन चव्हाण या दोघांचा मृत्यू झाला होता, तर एक तरुण गंभीर जखमी झाला होता.या प्रकरणाचा तपास सुरू असताना उल्हासनगर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आरोपी चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी हिललाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या हत्याकांडामागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.या घटनेमुळे कैलाश कॉलनी परिसरात अजूनही तणावाचे वातावरण कायम आहे.





