Thane : नीट पेपरफुटीमुळे कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होत असल्याची भावना व्यक्त करत कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत सरकारसमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सोशल माध्यमे आणि प्रसारमाध्यमांमध्ये कोचिंग क्लासेसबाबत नकारात्मक चर्चा सुरू असल्याने संपूर्ण क्षेत्रावर संशय व्यक्त केला जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मात्र सर्वच कोचिंग क्लासेस या गैरप्रकारांमध्ये सहभागी नसून काही मोजक्या मोठ्या अकॅडमी, व्यावसायिक क्लासेस आणि आर्थिक फायद्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही मोठे क्लासेस महाविद्यालयांशी संगनमत करून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. तसेच शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांचा खासगी शिकवणीसाठी वापर करून शिक्षण व्यवस्थेलाच पोखरण्याचे काम सुरू असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी परिसरात कमी शुल्कात शिक्षण देणारे अनेक प्रामाणिक क्लास चालक काम करत असताना काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याची खंतही संघटनेने व्यक्त केली.
यावेळी संघटनेकडून सरकारसमोर अनेक मागण्या करण्यात आल्या. नीट आणि जेईईसारख्या परीक्षा रद्द कराव्यात, पेपरफुटीत सहभागी आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षकांना खासगी शिकवणी घेण्यास बंदी घालावी, तसेच महाविद्यालये आणि क्लासेसमधील संगनमतावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच “एक देश, एक मंडळ, एक अभ्यासक्रम आणि एकच परीक्षा” हे धोरण लागू करण्याची मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती सक्तीची करावी आणि बारावीच्या परीक्षेच्या आधारेच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





