Kalyan : कल्याणमध्ये केमिस्ट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; ऑनलाईन बेकायदेशीर औषध विक्रीविरोधात आंदोलन
: बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य सवलती आणि जीएसआर अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आज देशव्यापी केमिस्ट बंद पुकारण्यात आला. या बंदला कल्याण-डोंबिवली परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे पंधराशे मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली.
ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तब्बल साडेबारा लाख केमिस्ट या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कल्याणमधील केमिस्ट कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या मोर्चात केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव सुरेश भट, जिल्हा कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश शेळके, कल्याण केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि औषध विक्रेते सहभागी झाले होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला असून सरकारने यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.



