ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

KALYAN | 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

0Points

KALYAN | 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात

ANC – प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींशी संबंध प्रस्थापित करणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि नंतर त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढून फसवणूक करणाऱ्या भामट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव आदर्श म्हात्रे असे असून, यापूर्वी त्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

पनवेल परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत असे. सुरुवातीला मैत्री करून तो त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणींच्या नावावर विविध बँकांमधून कर्जे काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

तपासात आतापर्यंत 140 हून अधिक तरुणींना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 11 तरुणींनी पुढे येऊन अधिकृत तक्रारी दाखल केल्या असून, आणखी काही पीडित महिला तक्रार देण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिक, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांची संख्या यामध्ये लक्षणीय असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीनेही फसवणुकीची तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधातील गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि ऑनलाइन नातेसंबंधांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

BYTE – सुवास हेमाळे, एसीपी डोंबिवली

 

 

What's your reaction?