KALYAN : कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार; रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला तिघांकडून बेदम मारहाण
कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दादर गोरखपूर रेल्वेगाडीत एका प्रवाशाला काही जण मारहाण करत असल्याची माहिती जवान नरेंद्र यादव यांना मिळाली होती.
यावेळी नरेंद्र यादव यांनी तत्काळ संबंधित डब्यात जाऊन प्रवाशाला मारहाण करणाऱ्या तिघांना खाली येण्यास सांगितले. मात्र फलाट क्रमांक चारवर उतरल्यावर या तिघांनी जवान नरेंद्र यादव यांच्यावरच अचानक हल्ला करत बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.




