BULDHANA | बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘ऑनलाईन’ शांतता समिती बैठक; इंधन आणि वेळेच्या बचतीचा संदेश
ANC – आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात प्रथमच सर्व शांतता समितीची बैठक ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम राबवला आहे.
मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत संपूर्ण जिल्हा एकाच वेळी ऑनलाईन जोडला गेला होता. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनचे ठाणेदार, तहसीलदार, नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच शांतता समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाची दखल घेत जिल्ह्यातील विविध भागांतून पदाधिकाऱ्यांना मुख्यालयात येण्यासाठी लागणारा वेळ आणि इंधनाची बचत व्हावी, या उद्देशाने प्रशासनाने बैठक प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
बैठकीदरम्यान ईद सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक पोलीस स्टेशनअंतर्गत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि बंदोबस्ताची माहिती यावेळी देण्यात आली. विविध तालुक्यांतील शांतता समिती सदस्यांनी त्यांच्या भागातील नियोजनाचा अहवाल सादर केला. तसेच सणासुदीच्या काळात मूलभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.





