धुळ्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा आरोप
धुळे शहरातील नवरंग जलकुंभ परिसरात सुरू असलेल्या खोदकामादरम्यान महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याची गंभीर घटना घडली आहे. खासगी यंत्रचालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महापालिकेच्या प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीखालील मुख्य जलवाहिनीचा अंदाज न आल्याने यंत्राचा फटका थेट जलवाहिनीला बसला.
त्यामुळे मोठ्या दाबाने पाण्याचे सुमारे पन्नास फूट उंच फवारे उडू लागले. काही तासांतच लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. या घटनेमुळे परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झाले आहे. कामाच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची देखरेख नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
