Bhivandi : भिवंडीत भाजप धर्मनिरपेक्ष आघाडीला मदत करत असल्याचा शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप; गटनेते मनोज काटेकर यांचा थेट निशाणा
भिवंडी महानगरपालिकेतील स्थायी समिती निवडणुकीनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भाजपचे चार सदस्य गैरहजर राहिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याचा थेट फायदा धर्मनिरपेक्ष आघाडीला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भिवंडीत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत काम करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे गटनेते मनोज काटेकर यांनी केला आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत भाजपचे चार सदस्य अनुपस्थित राहिल्याने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा विजय झाला. यानंतर भाजपची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
मनोज काटेकर यांनी सांगितले की, पक्षाचे ज्येष्ठ नेते मदनबुवा नाईक यांच्यासह त्यांनी स्वतः भाजप गटनेते संतोष शेट्टी आणि आमदार महेश चौघुले यांची तीन दिवस भेट घेतली होती. स्थायी समितीत शिवसेना शिंदे गटाचे पाच आणि भाजपचे चार सदस्य असल्याने एकत्रितपणे विजय शक्य होता. शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अन्यथा भाजपला आम्ही पाठिंबा देण्यास तयार असल्याचा प्रस्तावही दिला होता. मात्र भाजपने दोन्ही प्रस्ताव नाकारल्यामुळे भाजप धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी काम करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बाईट : मनोज काटेकर — शिवसेना शिंदे गट गटनेते




